यवतमाळ : ८ मे – उमरखेड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबावनच्या जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उमरखेड वनपरिक्षेत्रातील अंबावनच्या राखीव वनक्षेत्रात हे मादी बिबट मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच उपविभागीय वनाधिकारी अमोल थोरात, मानद वन्यजीव रक्षक आर. एस. विराणी, वनपरिक्षेत्र अधिकारी भारत खेळबांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी केली असतात बिबट नाल्यात मृतावस्थेत दिसून आला. या बिबट्याची तपासणी केली असता तिचे वय चार वर्षे असल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यानंतर घटनास्थळावर पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. एन. कुंभार, डॉ. के. बी. मिसाळ, पशुधन विकास अधिकारी यांच्यासमक्ष बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन करीत असताना बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले. प्रथमदर्शनी या बिबट्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याची शक्यता डॉ. कुंभार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय वनाधिकारी अमोल थोरात करीत आहेत.