कौटुंबिक वादातून केली युवकाची हत्या, ७ आरोपी अटकेत

भंडारा : ७ मे – आंधळगाव जवळील (मांडेसर) रामपूर येथील एकाच कुटूंबातील शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मांडेसर येथील सव्वालाखे कुटुंबाच्या शेतीचे काही दिवसांपूर्वी पोटहिस्से करण्यात आले. परंतु जागेच्या वाटणीवरून कुटुंबातील काही सदस्य नाराज होते. यातच जागेला घेऊन त्यांच्यात वाद होता. सकाळी ८.३0 वाजता रवींद्र शामराव सव्वालाखे (३८) हा रामपूर येथील आपल्या शेतावर गेला असता आरोपींसोबत त्याचा वाद झाला. नात्यात काका, चुलतभाऊ असलेल्या आरोपींनी हल्ला चढवून रवींद्रच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला. भांडणाचा आवाज ऐकून मृतकाचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला. परंतु आरोपी हातात लाठ्या काठ्या, तलवार घेऊन त्यालाही मारायला धावले. यात तो किरकोळ जखमी झाला.
देवेंद्र शामराव सव्वालाखे (३0) याच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसांनी कलम ३0२, ३२४, १४७, १४८, १४९, भादंवि, म.पो.का. १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे (५५), बाबूलाल उपासू सव्वालाखे (५३), गेंदालाल जलकन सव्वालाखे (३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे (२३), बळीराम बाबूलाल सव्वालाखे (२१), विनोद जलकन सव्वालाखे (३५) सर्व रा. रामपूर(मांडेसर) या सात आरोपींना अटक केली आहे.
पुढील तपास ठाणेदार राहुल देशपांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलिस हवालदार सोमेश्वर सेलोकर, मिथुन चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे हे करीत आहेत

Leave a Reply