जिवंत विद्युत प्रवाहाने चितळाचा झाला मृत्यू

भंडारा : ७ मे – शेतातील पिकांच्या संरक्षणाकरिता लावलेल्या लोखंडी तारेच्या कुंपणावरील जिवंत विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील फुटाळा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी वनविभागाने दोघांना अटक केली. सोमा श्रावण नेवारे व महेंद्र सोमा नेवारे दोघेही रा. फुटाळा अशी आरोपींची नावे आहेत.
मोहाडी तालुक्यातील बरीच गावे जंगलव्याप्त आहेत. या जंगलव्याप्त भागातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असल्याने शेतकरी त्यांच्या पीक संरक्षणाकरिता विविध उपाय करतात. तालुक्यातील फुटाळा येथील शेतकरी महेंद्र सोमा नेवारे व सोमा श्रावण नेवारे हे जांब/कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हिवरा उपवन क्षेत्रातील बीट क्रमांक 2 मधे शेती करतात. त्यांनी शेतातील पिकांच्या संरक्षणाकरिता बांधीला लोखंडी तारेचे कुंपण करून त्यावर जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. या तारांचा करंट लावून चितळाचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी के.जी. राठोड यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले असता मृतावस्थेत पडलेला चितळ मिळून आला. याप्रकरणी महेंद्र व सोमा नेवारे या पितापुत्रावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9, 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. सदर कारवाई उपवनसंवरक्षक एस. बी. भलावी व सहाय्यक वनसंरक्षक एस.एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी केशव राठोड, क्षेत्रीय सहाय्यक एम.ए. खान, वनपाल इंद्रीस शेख, वनरक्षक बी.जी. लोडे, आर.डी. पांढरे यांनी केली.

Leave a Reply