नागपूर : ६ मे – करोनाशी लढताना प्राणवायूसाठी झुंजणाऱ्या नागपूरकरांना सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरातून वायूवेगाने प्राणवायू नागपुरात दाखल होत असून शहरातील प्राणवायूचा तुटवडा बऱ्याचअंशी कमी झाला आहे.
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी ओडिशातून प्राणवायूची आयात करण्यात येत आहे. बुधवारी वायुदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून टँकर भूवनेश्वरकडे रवाना झाले आहेत.
याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने सूक्ष्म, मध्यम उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून १० कोटी रुपयांचा प्राणवायू प्रकल्प उभारून त्याद्वारे खासगी इस्पितळांना त्याचा पुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शहरात गुरुवारी पुन्हा प्राणवायूचे टँकर शहरात पोहचले.