मुंबईत ७ किलो युरेनियम जप्त, दोन आरोपी अटकेत

मुंबई : ६ मे – दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मुंबईतील नागपाडा भागातून 7 किलो युरेनियम जप्त केले. एटीएसने अटक केलेले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित म्हणजे डबल ग्रॅज्युएट आहेत. एटीएसच्या प्राथमिक तपासात आरोपींनी त्यांच्याकडे हे युरेनियम भंगारातून आल्याचा दावा केला आहे. मात्र 21 कोटी 30 लाखांचे युरेनियम नेमके कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे या प्रकरणी कारवाई करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात हे युरेनियम आरोपींकडे असल्याची खात्रीशीर माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार हे युरेनियम तपासणीसाठी BARC या वैज्ञानिक संस्थेत पाठवण्यात आले होते. जवळपास दोन महिन्यांनतर हे युरेनियमच असून ते नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याची तीव्रता अधिक असल्याचं स्पष्ट झालं. एटीएसने गुन्हा दाखल करुन आरोपी जिगर पांड्या आणि अबू ताहीर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता अॅटोमिक रिसर्च विभाग नागपूरच्या प्रादेशिक संचालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एटीएसने तब्बल दोन महिन्यांतर गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केलीय.
एटीएसने अटक केलेले आरोपी जिगर पांडया आणि अबू ताहिर दोघंही एकमेकांचे कॉलेजपासून मित्र आहेत. जिगर पांड्या आयटी कंपनीत काम करतो, तर अबू ताहिर इम्पोर्ट-एक्स्पोर्टचं काम करतो. दोघांनीही MBA केलं आहे. ताहिरच्या वडिलांचा गोवंडी येथे भंगारचा व्यवसाय होता. एका भंगाराच्या ट्रकमधून पाच ते सहा वर्षांपूर्वी हे युरेनियम आलं होतं.
युनिक पदार्थ असल्याने त्यांनी तो कपाटात ठेवला होता. मात्र ते युरेनियम आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अबू ताहीरला जेव्हा हा तुकडा फेब्रुवारी 2021 मध्ये तो दिसला. त्यावेळी त्याने लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर या धातूबाबत रिसर्च केले. त्याचा मित्र जिगर हा आयटी कंपनीत असून तो अशा खासगी लॅब मालकांच्या संपर्कात असल्याने अबूने त्याला या धातूचा एक तुकडा तपासणीसाठी दिला.

Leave a Reply