शपथविधी दरम्यान ममता बॅनर्जींचे राज्यपालांशी तू तू मैं मैं

कोलकाता : ५ मे – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. भाजपा-तृणमूल यांच्याकडून एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले जात असून, याच गदारोळातच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनखार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनातच दोघांमध्ये खटका उडाल्याचं बघायला मिळालं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत २१३ जागा जिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. करोनाचा उद्रेक झालेला असल्यानं साधेपणानं हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपालांनी जगदीश धनखार यांनी त्यांना शपथ दिली.
शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “करोना संकट नियंत्रणात आणण्याला सरकार प्राधान्य देणार आहे. याचसंदर्भात दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर तीन वाजता पत्रकार परिषद घेऊ. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.
त्यानंतर बोलताना राज्यपालांनी बंगालमधील हिंसाचाराकडे ममतांचं लक्ष वेधलं. “निवडणूक निकालानंतर उसळेला संवेदनाहीन, भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री तत्काळ पावलं उचलतील. या परिस्थिती माझी छोटी बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान आणि कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल,” असं धनखार म्हणाले.
राज्यपालांनी मांडलेल्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. राज्यपालांच्या हातातील माईक हातात घेऊन ममता म्हणाल्या,”मी आजच शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या हाती होतं. निवडणूक आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. ज्यांनी कोणतंही काम केलं नाही. अशा परिस्थिती आपण कामाला सुरुवात करत आहोत,” असं ममता म्हणाल्या.

Leave a Reply