विवाहित इसमाने मैत्रिणीला फसवून केला अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : ५ मे – विवाहित इसमाने मैत्रिणीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. युवती गर्भवती झाल्यावर तिला सोडून तो पळून गेला .
प्राप्त माहितीनुसार, २४ वर्षांची युवती अंजुमन महाविद्यालयात शिकते. ती तिच्या आईसह बजेरियात राहते. फेब्रुवारी २0२0 मध्ये पीडित मुलीच्या पाटणसावंगी येथे राहणार्या मैत्रिणीची आणि तिची एम्प्रेस मॉलमध्ये भेट झाली. त्यावेळी तिच्या सना नावाच्या मैत्रिणीने तिची ओळख अविनाश दोडीराम भिमटे (३३) रा. पारशिवनी याच्याशी करून दिली. त्यानंतर अविनाश आणि पीडित मुलीची चांगलीच मैत्री झाली. मैत्री झाल्याने तो वारंवार तिच्या घरी येऊन लागला. त्यांचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे. त्यांची मैत्री बहरत गेली. ३ जुलै २0२0 मध्ये अविनाश युवतीच्या घरी आला. त्याने तिला लाँग डाईव्हवर चलायला म्हटले. दोघांचीही चांगलीच मैत्री असल्याने युवती त्याच्यासोबत लाँग ड्राईव्हवर गेली. उमरेड रोडवर लाँग ड्राईव्हदरम्यान त्याने दारू पिली आणि मुलीलाही बळजबरी दारू पाजली. दारू पिल्याने मुलीला चांगलीच नशा चढली. त्यामुळे तिची तब्येतही खराब झाली. घरी मुलगी आणि तिची आईच असल्याने जास्त तब्येत खराब झाल्यास त्यांना मदतीची गरज लागेल, असे सांगत आरोपी अविनाश त्या रात्री त्यांच्याकडेच थांबला. मुलीची आई झोपल्यानंतर त्याने नशेत असलेल्या मुलीवर अत्याचार केला आणि तिथून मध्यरात्री निघून गेला. दुसर्या दिवशी मुलीने त्याला त्याची पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी दिली. तेव्हा त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन तक्रार करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर ऑक्टोबर २0२0 मध्ये ते दोघे माधवनगर इसासनी येथे एका फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेथे ते पती-पत्नीप्रमाणे राहू लागले होते. लॉकडाऊन संपल्यावर लग्न करू, असे त्यावेळी अविनाशने पीडित मुलीला वचन दिले होते. दरम्यान, एक दिवस अविनाशच्या मोबाईलमध्ये मुलीला अविनाशचा एका छोट्या मुलासोबत फोटो दिसला. तिने त्याला त्याबद्दल विचारतात त्याने तो विवाहित असून, दोन मुलांचा बाप असल्याचे सांगितले. हे कळताच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. ३ मार्चला दोघांमध्येही जोरदार भांडण झाले. अविनाशने लाकडी दांड्याने मारून त्यावेळी मुलीचे डोके फोडले आणि तो निघून गेला होता. त्यानंतर मुलगी तिच्या घरी परत आली. ७ मार्चला तिला ती गर्भवती असल्याचे कळले. घाबरलेल्या अविनाशने तिला लग्न करण्याचे सांगितले. पण, त्यानंतर नकार देत मुलाची जबाबदारीही नाकारली. यामुळे व्यथित झालेल्या मुलीने गणेशपेठ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. मिळालेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply