अमरावती : ५ मे – मेळघाट वनविभागातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागात एका कर्मचारी महिलेने दारूच्या नशेत धिंगाणा व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कर्मचारी महिला एवढी नशेत होती की, तिने पोलिसांनादेखील शिवीगाळ केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात राडा करणारी ही महिला दारूच्या नशेत होती. असं वैद्यकीय विभागाच्या अहवालात म्हटले आहे. या महिलेला कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ही महिला कोणाचेच ऐकण्याच्या तयारीत नव्हती, त्यामुळे अचलपुर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. मात्र या महिलेने पोलिसांसोबत देखील वाद घातला. या महिलेला वैद्याकीय तपासणीसाठी आणले असता ही महिला नशेत असल्याचा धक्कादायक प्रकार सरमोर आला आहे.
दरम्यान या महिलेने कार्यालयात राडा का केला, तिची तक्रार नेमकी काय होती? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून या महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा या महिलेने डॉक्टरांना देखील शिवीगाळ केली. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.