नागपूर : ५ मे – पूर्व विदर्भातील कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे काही अंशी पूर्व विदर्भाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे असे म्हणता येईल. रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूलाही काही प्रमाणात घट झाली असली तरीही मृत्यूंचे आकडे भीतीदायकच आहेत. आता मृत्युसंख्येत लक्षणीय घट आवश्यक झाली आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ८२३५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून १६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर दिलदायक म्हणजे आज १२१३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर नागपूर शहरात गेल्या २४ तासात ४३९९ रुग्णांची नोंद झाली असून ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७४०० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्याच्या उपराजधानीत गेल्या २४ तासात ४३९९ रुग्णांची नोंद झाली असून त्यात १८५३ रुग्ण ग्रामीण भागातील, २५३४ शहरातील तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. नागपूर शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ४३२९३८ वर पोहोचली आहे. शहरात आज ८२ मृत्यू झाले आहेत. शहरातल्या मृत्युसंख्येत आज पुन्हा वाढ झालेली आहे. आजच्या मृत्यूंमध्ये २२ ग्रामीण भागातील, ४८ शहरातील तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
आज शहरात २१६१२ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ६३१४ ग्रामीण भागात तर १५२९८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. आज ७४०० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५८९९४ वर पोहोचली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज ग्रामीण भागातील २७१८ तर शहरातील ४६८२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या शहरात ६६११६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील २९४६८ ग्रामीण भागातील तर ३६६४८ शहरातील रुग्ण आहेत.