पोलीस कर्मचाऱ्याने केली वृद्ध भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण

यवतमाळ : ४ मे – पोलीस निरीक्षकासमोरच एका वृद्ध भाजी विक्रेत्याला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार नेर तालुक्यातील बाणगाव येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदर भाजी विक्रेत्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच केली आहे. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर नेर पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी नेर तालुक्यातील बाणगाव येथे ही घटना घडली आहे. गावात हदुसिंग चव्हाण या ६५ वर्षीय वृद्धाचा भाजीपाल्याचा व्यवसाय असून त्याला कोणतीही चूक नसताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गस्तीवरील पोलिसांची गाडी गावात आली. काही वेळातच या गाडीतून पोलीस अधिकारी व कर्मचारी बाहेर पडले व त्यांनी गावकऱ्यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत हदुसिंग चव्हाण जखमी होवून खाली पडले. त्यानंतर देखील पोलrस कर्मचारी नरेंद्र लावरे यांनी मारहाण सुरूच ठेवली. त्यात हदुसिंग चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. दरम्यान, गावकऱ्यांसह कुटुंबीयांनी धाव घेवून त्यांना तातडीने नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चव्हाण यांना नेर येथून यवतमाळ येथे हलवण्यात आले. तिथे उपचार घेतल्यानंतर हदुसिंग चव्हाण यांची प्रकृती आता चांगली असून आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून त्यांनी या घटनेबाबत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांच्यासमोरच कुठलेही कारण नसताना पोलीस कर्मचारी नरेंद्र लावरे यांनी मला लाठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीबाबत नेरचे पोलीस निरीक्षक घुगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. घटनास्थळावरील काही व्हिडिओही हाती आले आहेत. यात संबंधित वृद्धाला उपचारासाठी रिक्षातून नेण्यात येत असल्याचे दिसत आहे. तसेच काही गावकरी पोलिसांना याबाबत जाब विचारत आहेत व त्यातून बाचाबाची सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply