नागपुरात खासगी रुग्णालयात रुग्णाकडून ऍडव्हान्स म्हणून तीन लाखाची वसुली

माजी महापौर संदीप जोशी यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार

नागपूर : ४ मे – खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच आहे, सरकारचा आदेश झुगारुन बहुतांश खासगी रुग्णालय रुग्णांकडून ॲडव्हान्स स्वरूपात वसुली करत आहेत. नागपुरातील आयुष्यमान नामक रुग्णालयाने एक रुग्णाकडून चक्क ॲडव्हान्स म्हणून तीन लाख रुपये वसूल केले. या संदर्भात रुग्णालयाने दिलेली ॲडव्हान्स रक्कम वसुलीची पावती दाखवत माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय. आणि संबंधित हॅास्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
कायद्याच्या कचाट्यात अडकू नये आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून रुग्णालय व्यवस्थापनाकडून चक्क साध्या पेपरवर हॅास्पीटलचा स्टॅंम्प मारुन ॲडव्हान्स रक्कम वसुली केली जातेय. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने ॲाडीटर नेमलेय, पण मनपाने नेमेलेले ॲाडीटर रुग्णालयाशी सेट झाल्याचा आरोप केला जातोय. सध्याच्या परिस्थितीत नागपुरातील एकेका घरातील तीन – तीन व्यक्ती रुग्णालयामध्ये ॲडमिट होतात आहे. आणि केवळ डिपॉझिटसाठी लाखो रुपये मागितले जात आहेत. डिपॉझिट दिलं नाही तर शहरातील अनेक रुग्णालय मरत असलेल्या रुग्णाला भरती देखील करत नाहीत असा देखील आरोप त्यांनी केला आहे. काही डॉक्टर निश्चितच चांगल काम करीत असताना काही डॉक्टर, काही रुग्णालये दुर्दैवाने मृताच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संदीप जोशी म्हणाले आहेत. यावरती प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयाला ऑडिटर दिलेला आहे. माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत सहज एकाशी बोललो त्याने सांगितले की, ऑडिटर हॉस्पीटल्सशी सेट झालेला आहे, पण दुर्दैवाने अनेक ऑडिटर सेट झालेले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. त्यामुळे गोर- गरिबांची प्रचंड आर्थिक लूट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकीकडे शासनाने खाजगी रुग्णालयाला स्पष्ट सांगितलेय की, ८० % शासकीय दराने तर २० % खाजगी दराने रुग्ण ॲडमिट करावे, परंतु याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. काही रुग्णालय या दुर्लक्षाचा वापर करून ऑडीटरसह रूग्णाची लूट करीत आहे. पिडीत रूग्णांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि बिल तपासून घेवेत, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply