नागपुरात अवैध दारू आणि जुगारअड्डा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक

नागपूर : ४ मे – अजनी हद्दीतील रामटेकेनगर टोली भागात सुरू असलेल्या दारू आणि जुगार अड्डय़ावर कारवाई करण्यासाठी अजनी पोलिसांचे पथक सोमवारी (ता.३) सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास गेले होते. मात्र, अवैध दारू आणि जुगार चालविणार्या आरोपींनी अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिस पथकाची चांगलीच तारांबळ उडाली.
रामटेकेनगर टोळी हा भाग अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. तेथे असलेल्या झोपड्यांमध्ये मोठय़ाप्रमाणात गावठी दारू तयार करण्यात येते. तसेच येथील झोपडयात जुगार अड्डेही मुक्तपणे सुरू असतात. परिसरातील लोक आपराधिक प्रवृत्तीचे असल्याने पोलिसांनाही येथे कारवाई करणे अवघड होते. पोलिस पथक तेथे कारवाई करायला गेले तर तेथील लोक पोलिसांना जुमानत नाही. पोलिसांच्या कारवाईत नष्ट केलेल्या दारूभट्टय़ा परिसरातील दारू बनविणारे पुन्हा सुरू करतात. अवैध दारू अड्डय़ावर धाड टाकण्यासाठी अजनी पोलिसांचे पथक सोमवारी ५.३0 वाजताच्या सुमारास टोळी भागात गेले होते. पण, पोलिसांना पाहताच अवैध दारू तयार करणार्यांमध्ये खळबळ माजली. पोलिसांना तेथून पळविण्यासाठी त्यांनी महिला आणि मुलांना पोलिसांवर दगडफेक करायला लावली. त्यामुळे वाहनात बसलेल्या महिला पोलिसांनाही तेथून जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. पोलिस पथकाने याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पोलिसांचा अधिक ताफा बोलावून घेतला. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. पाच आरोपींना ताब्यात घेतले.

Leave a Reply