झुडपात दडून बसलेल्या वाघाने दुचाकीवर केला हल्ला

गोंदिया : ४ मे – झुडपात दडून बसलेल्या वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याची घटना गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात काल संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, दोघे दुचाकीस्वार खाली पडले तर दुसरीकडून येणार्या वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने पळ काढला. यावेळी माजी जि.प. सदस्य राजू चांदेवार यांनी दोन्ही दुचाकीस्वारांना त्वरित प्रसंगावधानाने वेळ वाया न घालता वाहनात बसवून घटनास्थळावरून हलविले. रंजित परशुरामकर (35), दानेश गहाणे (40) दोन्ही रा. खाडीपार अशी दुचाकीस्वारांची नावे आहेत.

खाडीपार येथील रंजित परशुरामकर व दानेश गहाणे हे दोघेजण दुचाकीने गोरेगावकडून डव्वाकडे जात होते. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मुंडीपार ते मुरदोली या गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगल शिवारात अचानक रस्त्याच्या एका बाजूने वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला चढविला. वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार दोघे खाली पडले. तर दुसरीकडे रस्त्याने जात असलेल्या चारचाकी वाहनांच्या प्रकाशामुळे वाघाने जंगलात पळ काढला. हा सर्व प्रकार दुचाकीस्वारांच्या मागे चारचाकी वाहनाने जात असलेल्या माजी जि.प. सदस्य राजू चांदेवार व त्याच्या चालकाने प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, दोन्ही जखमी युवकांना वाचविण्याच्या अनुषंगाने जीवाची पर्वा न करता चांदेवार यांनी दुचाकीस्वारांची विचारपूस केली. दोघांनाही स्वतःच्या वाहनात घेवून घटनास्थळावरून रवाना झाले. एकंदरीत या घटनेत माजी जि.प. सदस्य राजू चांदेवार हे त्या दोन्ही युवकांसाठी देवदूत ठरल्याची चर्चा जनमानसात आहे.

Leave a Reply