चंद्रकांत पाटील यांनी कोर्टाला खिशात ठेवल आहे का? – हसन मुश्रीफ यांचा सवाल

मुंबई : ४ मे – पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन संताप व्यक्त करत, भुजबळ यांना धमकी दिली होती. यावरुनच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोर्टाला खिशात ठेवल आहे का? असा प्रश्न उपस्थित करत मंत्री भुजबळ यांची त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली आहे. शिवाय आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन, रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगची चौकशी करावी, अशी मागणीही हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके ठेवली होती. त्याचा मास्टर माईंड कोण? कशासाठी ठेवली? हे अजून एनआयएने जाहीर केलेले नाही. प्रसारमाध्यमांनी अनेकदा सचिन वाझे सोबत परमबीर सिंह यांच्याकडे संशयाची सुई दाखवली. पोलीस अधिकाऱ्यांनीही परमबीर सिंहावर आरोप करत तक्रारी दाखल केल्या. आता क्रिकेट बुकीनेही सिंह यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसूलीचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांच्यावर 100 कोटीहून अधिकचे आरोप आहेत. अंडरवर्ल्ड सोबतही परमबीर सिंह यांचे संबंध आहेत. असे अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावत आहे. या सर्व प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी होती. मात्र, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी चौकशीतून माघार घेतली आहे. याचे कारण अस्पष्ट असल्याचे मुश्रीफ यांनी सांगिलते आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी शासनाने कडक धोरण आखले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, रश्मी शुक्ला या पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या गटात गेलेल्या अधिकारी आहेत. त्या फोन टॅपिंग करत होत्या. आमचे सहकारी यड्रावकर यांना 20 कोटींची लाच दाखवली होती. तसेच याप्रकरणी सरकारने धोरण आखून चौकशी करणे, आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगलामध्ये ममता बॅनर्जीं यांनी संघर्ष करुन विजय मिळवला. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरले असतानाही एकहाती विजय ममता बॅनर्जींंनी मिळवला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर शुभेच्छा दिल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत, तुमचा जामीन रद्द करु, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मंत्री मुश्रीफ यांनी पाटील यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखे ही मंडळी बोलू लागल्याचे मुश्रीफ यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच बोलण्याचा जो रोख होता, जो गर्व होता, तो जनता कदापी सहन करणार नाही, असा सूचक इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

Leave a Reply