मुंबई : ४ मे – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. पण, सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
100 वसुली आरोपांची प्राथमिक तपास करत सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहे.
तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते.