ऐका दाजिबा – विनोद देशमुख

विधवा-विलाप

“स्वत:चा नवरा मेला तरच सवतीला वैधव्य येईल” अशी क्षुद्र, आत्मघातकी व्रुत्ती काय असते, याचा प्रत्यय परवाच्या मिनी जनरल इलेक्शनमध्ये आला. बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या भाजपाविरोधी पक्षांनी जो आनंद व्यक्त केला, तो वरील विधवाविलाप प्रकारात मोडणाराच म्हणावा लागेल. स्वत:च्या पदरात फार काही पडले नसतानाही, हे पक्ष “बेगाने शादीमें अब्दुल्ला दिवाना” होऊन बेभान नाचत आहेत. यावरून, या पक्षांचे दिवाळे निघण्याच्या मार्गावर असून, त्यांचे नेते स्वत: मूर्खांच्या नंदनवनात राहून जनतेला उल्लू बनवत आहेत, असा एकच निष्कर्ष निघू शकतो.
या देशातील सर्वात जुन्या, वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेस पक्षाचे हाल बघा. या पाचही राज्यांमध्ये एकेकाळी काँग्रेसचाच बोलबाला होता. केरळ आणि बंगालमध्ये डाव्यांनी त्यांना धक्का दिला, तर द्रविड पक्षांनी तामिळनाडूतून त्यांना धक्के मारून बाहेर काढले. आसाम अन् पुद्दुचेरीत भाजपा, मित्रपक्षांनी त्यांना बेदखल केले. यावेळीही आसाम वगळता इतरत्र, दखल घेण्याइतपतही काँग्रेस आमदार निवडून आले नाहीत. बंगालमध्ये तर त्यांच्या गळ्यात भोपळा पडून हा पक्षच हद्दपार झाला ! म्हणजे एकाही राज्यात काँग्रेसला यश मिळाले नाही. तरीही काँग्रेसवाले मोदी-भाजपा-संघ यांच्या द्वेषापोटी भाजपाचा पराभव साजरा करताना दिसतात. “मला नसेल मिळाले, पण तुलाही नाही मिळाले” हा तो खुनशी आनंद !
आता काँग्रेसचे खासदार (राज्यसभा) असलेले, नेहरू-गांधी घराण्याचे चाटुकार पत्रकार कुमार केतकर यांनी तर कमालच केली ! “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून, भाजपा हा उत्तर भारतीय प्रादेशिक पक्ष आहे” असा जावईशोध त्यांनी परवा एका व्रुत्तवाहिनीवर बोलताना लावला. एखाद्या पक्षाचा, घराण्याचा अंधभक्त कोणत्या टोकाला जाऊन चापलुसी करू शकतो, त्याचेच हे एक उदाहरण म्हणायचे. “इंदिरा इज इंडिया” असे म्हणणाऱ्या देवकांत बरूआ यांच्या रांगेत बसणारे ! केतकर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असताना नागपूर श्रमिक पत्रकार संघात त्यांची मीट द प्रेस झाली. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला- काँग्रेसचे, त्यापेक्षाही नेहरू-गांधी घराणेशाहीचे भाट, असा आपल्यावर आरोप होतो… यावर ते ताडकन उत्तरले- “भाट असल्याचा मला गर्व आहे ! पण मग संघाचेही भाट आहेतच की.” (घराणेशाहीचा मुद्दा सोयीस्करपणे बाजूला !) तरीही केतकर लोकशाहीवादी आणि पुरोगामी. याचे बक्षीसही त्यांना मिळाले. भल्याभल्यांचे तिकीट कापून काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठविले. त्याची परतफेड करताना भाजपाला प्रादेशिक पक्षाचा शाप देणे आलेच ! केन्द्रात लागोपाठ दुसऱ्यांदा आणि 29 राज्यांपैकी 13 राज्यांमध्ये सरकार असलेला भाजपा प्रादेशिक पक्ष आणि जेमतेम 6-7 राज्यांमध्ये सत्तेत असलेला महान काँग्रेस पक्ष मात्र राष्ट्रीय ! युक्तिवाद काय, तर काँग्रेस पक्ष देशभर पसरला आहे आणि भाजपा दक्षिण भारतात नाहीच. अहो केतकर, सरकार असो की नसो, काँग्रेस आणि भाजपा विचाराचे लोक सर्वत्र आहेत. निवडणुकीच्या राजकारणात काही ठिकाणी दोघांचीही पीछेहाट झाली आहे. त्याचे कारण स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांचा फटका दोघांनाही बसला आहे. तेव्हा तोलायचेच असेल तर एकाच तराजूत तोला- दोघेही राष्ट्रीय किंवा दोघेही प्रादेशिक. आहे तयारी ? चापलुसीलाही काही हद्द असते ना राजेहो ! भाजपा राष्ट्रीय नाही, तर मग काय कम्युनिस्ट, राष्ट्रवादी, शिवसेना यांना राष्ट्रीय पक्ष म्हणायचे का ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर अशी गोची झाली की, रडावे की हसावे, तेच कळेनासे झाले आहे त्यांना ! भाजपाला फक्त एक राज्य आसाम मिळेल, ही त्यांची शापवाणी पूर्ण खरी ठरली नाही. पुद्दुचेरीही रालोआला मिळाले. याचा अर्थ, सामना 3-2 असा झाला. बंगालची वाघीण ममतादीदीने भाजपाला धोबीपछाड दिली, हे खरेच. मात्र, पंढरपुरात भाजपानेही राष्ट्रवादीला लोळवून त्यांची जागा हिसकली. सत्ताधारी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सहभागी असताना हे घडले. (बहुदा विठोबा कोपला ! ) हे अपयश झाकण्यासाठी पवारांनी वेगळाच मुद्दा काढला. काय तर म्हणे, भाजपा बंगालमध्ये रडीचा डाव खेळत आहे ! कुठला रडीचा डाव ? पराभव खुद्द पंतप्रधानांनी मान्य केला. परंतु, ममताचा नंदीग्राममधील पराभव तुम्हाला पचत नाही, हा तुमचा प्राँब्लेम आहे. ममताचा पराभव होऊ शकत नाही का ? या देशात इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शिबू सोरेन, बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारखे पदावरील नेते हारले आहेत. तेथे ममता क्या चीज है ? शिवाय, नंदीग्राम हा अधिकारी कुटुंबाचा व्यक्तिगत गढ आहे. पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये ते दिसूनही आले. मधे ममता आघाडीवर गेल्या. हीच संधी साधून, निकालात घोळ असल्याचा देखावा कोणीतरी मुद्दाम उभा केला अन् पवारांसारखा ज्येष्ठ नेता त्यावर लगेच व्यक्त झाला. पण ममतानेच त्यांना तोंडघशी पाडले ! पराभव स्वीकारला आणि निकालाला आव्हानही दिले. आता हे प्रकरण न्यायालयातही जाऊ शकते. ही रास्त भूमिका झाली. पण, पंढरपुरात रडवेले झालेले, संबंध नसताना नंदीग्रामला रडीचा डाव म्हणत बसले. ही अत्यंत केविलवाणी परिस्थिती राष्ट्रवादीवर, म्हणजे मविआ सरकारच्या रिमोट कंट्रोलवर आली ! हे आपले जाणते राजे !
शिवसेनेबद्दल काय बोलायचे ? शेजारच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटणे म्हणतात ते हेच ! पाचही राज्यांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नाही. तरीही त्यांनी ममतादीदीला पाठिंबा (Voting in absentia म्हणावे का याला !) दिला होता. ममता स्वबळावर, एकहाती, दोनत्रुतीयांश बहुमतासह लागोपाठ तिसऱ्यांदा जिंकल्या. स्वकष्टार्जित संपूर्ण यश. तुमच्यासारखी जोडतोड केलेली तीन पायांची खुर्ची नाही ! दुसरा कोणीतरी रिमोट कंट्रोलही नाही ! ते जाऊ द्या. पण तुमच्या स्वत:च्या राज्यात काय झाले हो ? पंढरीरायाने विजयाचा प्रसाद भाजपाला दिला ! त्याबद्दल बोला ना. पंढरपूरच्या मतदारांनी राष्ट्रवादीसह तुमच्या सत्तारूढ आघाडीला आणि घराणेशाहीला नाकारले. हे कसे नाकारता तुम्ही ? आता होऊन जाऊ द्या तीन पक्षांमध्ये “वरून कीर्तन, आतून तमाशा”. बोला, पंढरीनाथ महाराज की जय !
आणखी एक मुद्दा कोरोनाच्या काळात निवडणूक घेण्याचा. हे ठरले तेव्हा किती पक्षांनी विरोध केला ? नसेल केला तर नंतर बहिष्कार का टाकला नाही ? सभा एकट्या भाजपानेच घेतल्या का ? पंढरपुरात पोटनिवडणूक असूनही सभा कशा झाल्या ते सर्वांनीच पाहिले. निवडणुका सर्वांनाच हव्या होत्या. कारण, राजकारणापुढे कोरोना गेला उडत, हेच सर्वांचे धोरण दिसले. महामारीच्या विशेष परिस्थितीत निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वांना एकमताने घेता आला असता. आपल्या स्वार्थी राजकीय पक्षांनी, नेत्यांनी जनताभिमुख होण्याची ही सुवर्णसंधी गमावली. हमाम मे सब नंगे

Leave a Reply