नागपूर : ३ मे – कोरोनामुळे मृत्यू होणा-या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडे पुरविण्याचा नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय इतर व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व घाटांवर ब्रिकेट्स सुद्धा नि:शुल्क आहेत. मात्र यासंबंधी नागरिकांमध्ये अनेक संभ्रम दिसून येतात. शिवाय दहन घाटांवर काही लोक शुल्क घेत असल्याचे सुद्धा दिसून येत आहेत. यासंबंधी तातडीने कार्यवाही करून दहन घाटांच्या दर्शनी भागावर नि:शुल्क लाकडांच्या पुरवठ्याबाबत मनपाच्या आदेशाचे फलक लावण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय सेवा आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांनी दिले.
आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती महेश महाजन उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उपसभापती विक्रम ग्वालबंशी, सदस्य नागेश मानकर, सदस्या विद्या कन्हेरे, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
मनपाच्या दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी शव घेउन जाणा-या नागरिकांमध्ये शुल्कासंदर्भात अनेक संभ्रम आहेत. त्यात त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून नियमाचा दाखला देउन पैसे सुद्घा आकारण्यात येत असल्याची तक्रार यावेळी समितीचे सदस्य नागेश मानकर यांनी केली. यावर उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार यांनी विस्तृत माहिती दिली. मनपाच्या सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहन घाटांव्यतिरिक्त सर्व घाटांवर नि:शुल्क लाकडे व ब्रिकेट्स उपलब्ध करण्यात येत होते. कोरोनाच्या या परिस्थितीत कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी या सहाही घाटांवर नि:शुल्क लाकडांचा पुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाद्वारे घेण्यात आला. या निर्णयानुसार आता सर्व घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून दिले जातात. शिवाय अन्य मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिकेट्स नि:शुल्क देण्यात येतात. यानंतरही जर मनपाच्या घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या दहनाकरिता लाकडांसाठी पैसे मागण्यात येत असल्यास त्याची तक्रार करण्यात यावी, त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. तक्रारीवरील कार्यवाहीसह नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम राहू नये व त्यांची फसवणूक सुद्धा होउ नये यासाठी नि:शुल्क लाकडांच्या पुरवठ्याचा संदेशाचा फलक दहन घाटाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश महाजन यांनी दिले.
याशिवाय कोव्हिडच्या या संकटाच्या स्थितीमध्ये मनपाचे आरोग्य कर्मचारी दहन घाटांवर अविरत सेवा देत आहेत. या सर्व दहन घाटांवरील व्यवस्था हाताळण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांना नियुक्त करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. दहन घाटांची व्यवस्था हाताळण्याबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे येउन मनपाकडे आपली नावे सादर करावी, असे आवाहनही यावेळी आरोग्य समिती सभापतींनी केले.