संपादकीय संवाद – पंढरपूरच्या पराभवांबाबत महाआघाडीतील नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा

नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसोबत महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या मतदारसंघातील आमदार भारत नाना भालके यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत भरत नानांचे चिरंजीव भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते त्यांना महाआघाडीतील इतर सर्व पक्षांचे समर्थन होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने समाधान अवताडे या कार्यकर्त्याला उभे केले होते. या निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपचे अवताडे निवडून आले आहेत.
अनपेक्षितरित्या म्हणण्याचे कारण असे की आजवर हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. दुसरे म्हणजे भरत नाना भालके यांच्या निधनानंतर लगेचच ही पोटनिवडणूक झाली होती आणि त्यांच्या मुलालाच पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यामुळे सहानुभूतीची लाट असणे निश्चितच अपेक्षित होते. शिवाय भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांचे भक्कम पाठबळ होते त्यामुळेच ही जागा हमखास राष्ट्रवादीच्याच ताब्यात जाणार असा सर्वांचाच कयास होता. हा अंदाज चुकवून समाधान अवताडे विजयी झाले म्हणूनच या विजयला अनपेक्षित म्हणावे लागते.
इथे आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल नोव्हेंबर २०१९ मध्ये ज्यावेळी भाजपशी धोकेबाजी करून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अभद्र शय्यासोबत करत महाआघाडी गठीत केली त्यावेळी महाआघाडीतील काही आमदार फुटून भाजपकडे जातील अशी शक्यता व्यक्त होत होती विद्यमान कायद्यानुसार या आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले असते. त्यावेळी कुणीही राजीनामा देऊन सोडून गेला आणि पुन्हा निवडणुकीला उभा राहिला तर तीनही पक्ष एकत्र येतील आणि त्याचा पराभव करतील अशी खुलेआम धमकी महाआघाडीचे नेते देत होते आजही हे तीनही पक्षांचे नेते भालकेंच्या विजयासाठी एकत्र आले होते. त्यांनी ताकदही भरपूर लावली होती. तरीही भाजपने महाआघाडीवर मात केली आहे.
महाआघाडीचे गठन झाल्यावर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होती या निवडणुकीत महाआघाडीला हा फटका बसला आहे. प्रथमदर्शनी या पराभवाला सध्या महाआघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेली नाराजी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. सर्वप्रथम जनादेश नसतानाही धोकेबाजी करून हे सरकार सत्तेत आले त्याचा सुप्त संताप जनमानसात आहेच त्यानंतर धोकेबाजी करून सत्तेत आले तरी जनतेच्या अपेक्षा जर या सरकाने पूर्ण केल्या असत्या तर जनसामान्यांना राजकीय धोकेबाजीबाबत काहीही देणेघेणे राहिले नसते मात्र, गेल्या दीड वर्षात हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यातही अयशस्वीच ठरले आहे. विशेषतः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जनसामान्यांची जी ससेहोलपट होते आहे त्याने जनमत प्रक्षुब्ध आहे. लॉक डाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अनेकांची वीज कापली जात आहे, आज दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढतेच आहे त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे परिणामी दररोज रुग्ण मृत्यूला सामोरे जाताना दिसत आहेत. या सर्वच प्रकारांमुळे जनमत संतापलेले असून तो संतापच मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
हा अंदाज जर बरोबर असेल तर महाआघाडीतील नेत्यांनी यावर आजच गांभीर्याने विचार करायला हवा या प्रभावातून काय शिकता येईल हे आजच बघणे गरजेचे आहे, उद्या कदाचित उशीर झालेला असेल.

अविनाश पाठक

Leave a Reply