शहराला काही अंशी दिलासा, ४९८७ बाधित, ७६ मृत्यू तर ६६०१ कोरोनामुक्त

नागपूर : ३ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाने काही प्रमाणात का असेना जनतेला दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत वाढली आहे. त्यात मृत्युसंख्या डोकेदुखी ठरत असताना आज मृत्युसंख्येतही काही प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ७६५७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्व विदर्भात आज १११६२ कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात गेल्या २४ तासात ४९८७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून ६६०१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर ७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रकोप पूर्णतः संपलेला नसला तरीही त्यात काही अंशी दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ४९८७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या ४२४३५७ वर पोहोचली आहे. आजच्या बाधितांपैकी १८१४ ग्रामीण भागातील, ३१६१ शहरातील तर १२ इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. आज ७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात १६ ग्रामीण भागातील, ४८ शहरातील तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ७६७५ वर पोहोचली आहे.
आज शहरात २०१७८ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ३४५२ ग्रामीण भागात तर १६७२६ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. सध्या शहरात ७२४३७ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ३१०९६ ग्रामीण भागात तर ४१३४१ शहरातील रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात ६६०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३४४२४५ वर पोहोचली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Leave a Reply