नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य…….

जयपूर : ३ मे – करोनाने देशभरामध्ये हाहाकार माजवला आहे. मागील वर्षी विद्यार्थी अडकून पडलेल्या देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
येथे करोना पॉझिटिव्ह आलेल्या एका वृद्ध दांपत्याने ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे.
आपल्यामुळे आपल्या नातवालाही करोनाचा संसर्ग होईल या भितीपोटी दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे.
या घटनेची सध्या संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरु असून कुटुंबियांना यामुळे जबर मानसिक धक्का बसलाय.
पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना सायंकाळी घडली.
येथे रेल्वे कॉलीनीमध्ये राहणारे हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय ७५) हे दोघेही करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दोघेही तणावाखाली होते.
त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला.
मात्र आपल्यामुळे आपला नातू रोहित याला करोनाचा संसर्ग होणार नाही ना ?
अशी चिंता त्यांना होती.
सायंकाळी कोणालाही काहीही न हीरालाल आणि शांती दोघेही घरातून निघून गेले.
त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली.
यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलिनी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
त्यांनी या दोघांचेही मृतदेह एम.बी.एस. रुग्णालयामध्ये नेले.
तेथील शवगृहामध्ये हे मृतदेह ठेवण्यात आले.
त्यानंतर तपास केल्यावर या दोघांची ओळख पटली.
तपासादरम्यान या दांपत्याचा मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली.

Leave a Reply