संपादकीय संवाद – देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आजचे निकाल

गेले अनेक दिवस संपूर्ण देशात पाच राज्यांच्या निवडणूका प्रचंड गाजत होत्या. अखेर आज त्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत भविष्यात देशाची पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाला घसघशीत यश मिळाले आहे. या ठिकाणी अनेक राजकीय पंडितांचे अंदाज त्यांनी चुकवले मात्र, व्यक्तिशः त्या पराभूत झाल्या परिणामी पश्चिम बंगालमध्ये त्यांची अवस्था आता गाढ आला पण सिंह गेला अशी झाली आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे यावेळी सर्वांचेच विशेष लक्ष लागून होते. केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्याचा चंग बांधला होता विशेष म्हणजे गेल्या ७० वर्षात आधीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष यांचे पश्चिम बंगालमध्ये कुठेही अस्तित्व नव्हते २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला या राज्यात फक्त ३ जागा मिळाल्या होत्या या पार्श्वभूमीवर भाजपने ममता बॅनर्जींना लालकरण्याची हिम्मत केली होती. यावेळी भाजपची सत्ता येऊ शकली नाही मात्र, जो भाजप ३ वर होता तो ८०च्या घरात पोहोचतो आहे भाजपचे हे यशही दुर्लक्षिता येणार नाही.
पश्चिम बंगालसोबत आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूमध्येही विधानसभा निवडणूका होत्या आसाम मध्ये या पूर्वीही भाजपची सत्ता होती. ती सत्ता कायम राखण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. याशिवाय पुडुचेरीमध्ये काँग्रेस कडून सत्ता काढून घेण्यातही भाजप यशस्वी झाला आहे.
पश्चिम बंगालप्रमाणेच केरळ आणि तामिळनाडूमध्येही भाजपचे कुठेही अस्तित्व नव्हते यावेळी केरळमध्ये भाजपला खाते उघडता आले आहे. तामिळनाडूमध्येही भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली होती. याठिकाणी अण्णाद्रमुकचे पीछेहाट झाली आहे. मात्र तिथेही भाजपने खाते उघडले आहे.
पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांवर कायम डाव्या पक्षांचे वर्चस्व राहिले होते. मधल्या काळात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने डाव्यांकडून सत्ता काढून घेतली तिथे काँग्रेसचे थोडेफार अस्तित्व होते. यावेळी राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला छुपा पाठिंबा दिला होता. हे जर खरे असेल तर तृणमूल काँग्रेस जिंकली पण बंगालमधून काँग्रेस जवळ जवळ संपल्यात जमा आहे. असाच प्रकार पुडुचेरीत झाला आहे. त्याठिकाणी काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. आणखी एक राज्य काँग्रेसच्या हातून निसटले आहे. पुडुचेरी सारखे छोटे राज्यही काँग्रेससला राखता येऊ नये हे देशातील सर्वात जुन्या पक्षाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेला विजय हा भाजपला जोरदार धक्का आहे असा दावा भाजप विरोधक करत आहेत. मात्र डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने झेंडा गाडला या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
एकूणच आजचे निकाल हे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतील हे निश्चित.

Leave a Reply