रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ

नागपूर : २ मे – महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाइकांनी लकडगंजमधील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून डॉक्टरसह तिघांवर हल्ला केला. ही घटना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पोलिस तैनात आहेत. याशिवाय वेळोवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षकही हॉस्पिटलला भेट देतात,अशात हा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. मुबश्शीर उल्ला नाजीम उल्ला खान (वय २९ रा. हसनबाग). दोन सुरक्षारक्षक चंदू आणि अमोल,अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज वर्मा व त्यांचे नऊ नातेवाइक गायत्री विष्णू वर्मा यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी गायत्री यांना तपासले. तपासनीनंतर त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गायत्री यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. डॉ. मुबश्शीर यांनी त्यांना समजिवण्याचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोन सुरक्षा रक्षकांवरही नातेवाइकांनी हल्ला केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचा ताफा तेथे पोहोचले. तणाव निवळला. पोलिसांनी राज वर्मा व त्याच्या नऊ नातेवाइकांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply