कोलकाता : २ मे – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ऐतिहासिक विजयाची नोंद करत असताना यामध्ये मोलाचा वाटा असणारे ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली. प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे.
प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं ते म्हणाले होते. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली असल्याचं ते म्हणाले.
“मला बाहेर पडायचं आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे. प्रशांत किशोर यांनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून आपण बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनीच याची सुरुवात केली होती. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदाने देतील, पण मी संन्यास घेत आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
“भाजपा १०० जागा जिंकेल सांगत संन्यास घेण्याची मागणी करुन ट्रोल करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की, आमचा विजय होत असतानाही आणि भाजपा १०० च्या पुढे जाऊ शकलेली नसतानाही मी बाहेर पडत आहे,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आय़ोगाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक आयोग भाजपाचा विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.