पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २ मे – महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आज देशातील पाच राज्यांच्या निवडणुकी पेक्षाही अधिक पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक निकालाचीच जोरदार चर्चा सुरू होती. कारण, या ठिकाणी भाजपाचे समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाली होती. अखेर यामध्ये भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, ”मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला आणि मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैर कारभाराला, गलथान कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम हे पंढरपूरच्या जनतेने केलं आहे.”
तसेच, ”आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीत ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाच्यावतीने तिन्ही पक्ष उतरले साम, दाम, दंड असे सर्व प्रकार त्या ठिकाणी वापरले गेले. प्रशासनाचा गैरउपयोग केला. मोठ्याप्रमाणात पैशांचा गैरवापर केला पण हे सगळं केल्यानंतर देखील, त्या ठिकाणी भाजपाला जनतेने निवडून दिलं. मी निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो आहे.” असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
तर, समाधान अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. पंढरपूर निवडणुकीत जनतेने ठाकरे सरकारविरोधात कौल दिल्याची पहिली प्रतिक्रिया अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.
याचबरोबर ”एक अतिशय जमिनीशी जुडलेलं व्यकीमत्व म्हणून गेली अनेक वर्ष राजकारणात ते आहेत आणि त्यांच्या सोबत प्रशांत परिचारक उमेश परिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत राहीले आणि एक अतिशय चांगल्याप्रकारे त्या ठिकाणी रणनीती आखून ही निवडणूक लढवली गेली. आमच्या सर्व खासदार, आमदार व नेत्यांनी तिथे अतिशय चांगल्याप्रकारे लक्ष घातलं व प्रचार केला. पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो.” असंही यावेळी फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply