नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मोठे नेते आहेत, पण अजिंक्य नाही – संजय राऊत यांची टीका

मुंबई : २ मे – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधत दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाही, हे आज बंगालच्या जनतेनं दाखवून दिलं, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. पश्चिम बंगालच्या निकालाबाबत बोलत असताना संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.
‘पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाला नाही, तर प्रचंड बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांना 125 जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममतादीदी घरी जातील असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. पण ममतादीदींनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिलं आहे. जिद्द काय असते हे ममतादीदींकडून शिकण्यासारखं आहे’ असं कौतुक करत संजय राऊत यांनी ममतादीदींचं अभिनंदन केलं आहे.
‘ममतादीदी नंदीग्राम मतदारसंघामधून सुद्धा जिंकतील. यात शंका नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नेते नाही, पण मोठे नेते आहे. निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांच्याकडे आहे. सत्ता आहे. पण ते अजिंक्य नाही, हे आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून दिसून आलं आहे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.
‘बेळगावमध्ये आम्ही मराठी माणसासाठी मैदानात उतरलो होतो. आम्ही त्यांच्यासाठी लढलो. निकाल काय लागतो हे नंतर पाहू, पण मराठी माणसं या निमित्ताने एकत्र आली, असंही राऊत म्हणाले.
आज सकाळीही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकतील, असं भाकित वर्तवलं होतं. तसंच, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता येणार हे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करतील. त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे. भाजपने सगळी ताकदपणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. अनेक केंद्रीय नेते हे बंगालमध्ये प्रचाराला आले होते. भाजपच्या संख्या नक्की वाढत आहे. लोकसभेतही जागा वाढेल. त्यांची मेहनत आहे, इन्वसेमेन्ट सुद्धा जास्त आहे. कुणाच्या पक्षाच्या जागा वाढत जरी असल्या तरी कोरोनाची संख्या महत्त्वाची आहे. कोरोनाची आकडेवारी कमी झाली पाहिजे, असाही टोलाही राऊत यांनी लगावला होता.

Leave a Reply