कोलकाता : २ मे – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोठं विधान केलं आहे. कोणीही जिंको, काही फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
कपिल सिब्बल यांनी ट्विट करून हे विधान केलं आहे. आज लोकांचा जीव वाचवण्याखेरीज दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. आज निकाला दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे.
देशात पाच राज्यांची निवडणूक असतानाच कोरोनाचं संकटही वाढलं आहे. देशातील बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्याही कमी झाली आहे. लोक ऑक्सिजन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही करत आहे. कोर्टानेही या संकटाची गंभीर दखल घेऊन सरकारला फटकारले आहे.
ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथली कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बंगालमध्ये गेल्या 24 तासात 17,411 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 96 कोरोना बळीचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,28,366 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 11,344 वर गेला आहे.