मनोरुग्ण युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालक आणि मित्राला अटक

नागपूर : १ मे – मानसिक स्थिती नीट नसलेल्या युवतीवर ऑटोचालक आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केला. याच मुलीवर यशोधरानगर हद्दीतही १५ दिवसांआधी सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार यशोधरानगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. ती तक्रार देत असतानाच मुलीने कपिलनगर हद्दीत झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. याप्रकरणी ऑटोवाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कन्हान येथील शिंगोरी गावात २१ वर्षीय सुस्वरूप मात्र, काहीशी मानसिकरित्या कमकुवत मुलगी तिच्या आई, बहीण आणि भावासोबत राहते. मुलगी घरच्यांना काही न सांगता नोकरी करायची आहे, असे ठरवून बर्डी आणि सदर येथे नोकरीच्या शोधात जात असते. कन्हान येथून गांधीबाग येथे जाण्यासाठी ती एका ऑटोवाल्याच्या ऑटोत नेहमी जायची. त्यामुळे तिची त्या ऑटोवाल्याशी चांगलीच ओळख झाली. मोहम्मद शहबाज इस्माईल शेख (२७) रा. कामठी, असे ऑटोवाल्याचे नाव आहे. मुलगी कामाच्या शोधात गांधीबाग येथे २१ जानेवारीला आली होती. दरम्यान, तिचा मोबाईल हरविला होता. तिने मोबाईल हरविला असल्याचे शहबाजला सांगितले. मुलगी दिसायला सुरेख त्यात काहीशी मतिमंद असल्याने ऑटोवाल्या शहबाजने मुलीला त्याचा मित्र मोबाईलचे काम करतो आणि तो मोबाईल ट्रेस करून मोबाईल शोधून देऊ शकतो, अशी थाप मारली होती. मुलीचा लगेच त्याच्यावर विश्वास बसला. त्यामुळे ती मोबाईल शोधून देण्यासाठी सारखी शहबाजच्या मागे लागली होती. शाहबाजनेही संधीचा फायदा उचलत तिला कामगारनगर येथील त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. नंतर त्याने त्याचा मित्र मो.सलीम शेख (२७) रा. कामगारनगर याला बोलाविले. त्याने मुलीला मोबाईल शोधून देतो, असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. सलीम हा हातमजुरीचे काम करतो. मुलीने त्यांना सांगितले की, तिचे तिच्या घरच्या लोकांशी भांडण झाले आहे, त्यामुळे तिला राहण्यासाठी जागा हवी आहे. मुलीची मानसिक स्थिती पाहता त्यांना पुन्हा संधी मिळली. आरोपी मो. सलीम हा विवाहित आहे. तो कामठी कोळसा टालजवळ राहतो. मुलीला राहण्यासाठी जागा दाखविण्यासाठी तो तिला कपिलनगर हद्दीतील भिलगाव येथील एका टिनाच्या घरात घेऊन गेला. तेथे त्याने पुन्हा मुलीवर अत्याचार केला. कोणाला याबाबत सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही मुलीला दिली होती. मात्र, यशोधरानगर हद्दीत मुलीवर १५ दिवसांआधी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मुलीची आई यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेली होती. तेथे पोलिसांनी मुलीची सखोल चौकशी केली असता तिने ऑटोवाला आणि त्याच्या मित्राचा प्रताप संगितला. यशोधरानगर पोलिसांनी मुलीला याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी कपिलनगर पोलिस ठाण्यात पाठविले. अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

Leave a Reply