अमरावतीत तडीपार दुचाकीचोराला केली अटक

अमरावती : १ मे – शाळा महाविद्यालयात जाऊन भविष्याचे नियोजन करण्याच्या वयात त्याने घफोड्या सुरू केल्या. पोलिसांनी अनेकदा समज दिली. शेवटी पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार घोषित केले. मात्र त्याने तडीपारीचा आदेश धुडकावून जिल्ह्यात दुचाकी चोरीचा सपाटाच लावला. शेख समीर शेख सलीम नामक या २४ वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १२ ते १३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
समीर हा परतवाडा मुगलाईपुरा येथील रहिवासी आहे. समीर हा घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी करायचा. त्यामुळे त्याला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. वास्तविकता शेख समीर हा केवळ पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तडीपार होता. कारण त्याने या काळात परतवाडा, ब्राम्हणवाडा थडी तसेच अमरावती शहरातून दुचाकी चोरी केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपाल उपाध्याय व त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २९) सायंकाळी समीर धारणीवरून परतवाडा येत असताना त्याला पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. ही दुचाकीसुद्धा चोरीची असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, समीर शेखला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मागील काही महिन्यात बारा ते तेरा दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले. या सर्व दुचाकी त्याने परतवाडा व परिसरात विक्री केल्या आहेत. तशी कबुली त्याने दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या चोरट्यासह जप्त केलेल्या दुचाकी एलसीबीच्या पथकाने परवताडा पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहेत.

Leave a Reply