भाजपला तीन आकडी जागा मिळाल्यास मी राजकारण सन्यास घेईल – प्रशांत किशोर यांचा दावा

कोलकाता : ३० एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात झालेल्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर आलोल्या एक्झिट पोल्सनुसार भाजप बऱ्याच जागांवर विजय मिळवणार असल्याचं दिसत आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खोटी ठरताना दिसत आहे. बहुतेक एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी असा दावा केला होता, की जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचं काम सोडेल. अशात आता समोर येत असलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांचा हा दावा खोटा ठरत असल्याचं चित्र आहे. अशात बंगाल निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलप्रमाणेच लागल्यास प्रशांत किशोर काय करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
एग्जिट पोलनुसारच भाजपला 100 हून अधिक जागांवर विजय मिळाल्यास प्रशांत किशोर आपल्या दाव्यानुसार खरंच राजकीय सल्लागाराचं काम सोडणार का? याची आता चर्चा रंगली आहे. किशोर यांनी असा दावा केला होता, की बंगाल निवडणुकीत भाजप तीन अंकी डिजीट पार करू शकणार नाही. असं झाल्यास ते आपलं काम सोडून देतील. त्यांनी असंही म्हटलं होतं, की भाजप केवळ वातावरण निर्मिती करतं, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही.
बंगालमधील चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यानच प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ चॅट समोर आली होती. यात ते तृणमूलच्या पराभवाविषयी बोलत होते. ही ऑडिओ चॅट भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शेअर केली होती. यात प्रशांत किशोर यांनी मान्य केलं होतं, की बंगालमध्ये भाजप जिंकणार आहे. मात्र, प्रशांत किशोर यांनी याला साफ नकार देत संपूर्ण बातचीत समोर आणण्यास म्हटलं होतं. हा त्या संभाषणातील काहीच भाग असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Leave a Reply