पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच येणार? एक्झिट पोलचा अंदाज

कोलकाता : ३० एप्रिल – पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधीच एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठी अटीतटीची ठरत आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपनं पूर्ण ताकद पणाला लावली होती. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले होते. तरीही एक्झिट पोलच्या अंदाजात पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सत्तेत परतण्याची चिन्हे वर्तवण्यात आलीत.
टीव्ही 9- पोलस्ट्राट नेही एक्झिट पोल घेतला असून, या एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 142 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर भाजपा या निवडणुकीत 125 ते 135 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. डावे आणि काँग्रेस आघाडीच्या पारड्यात अवघ्या 16 ते 26 दरम्यान जागा पडण्याचा अंदाज आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकीची प्रक्रिया 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाने सुरू झाली.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 292 जागांवर मतदान झाले. पश्चिम बंगालमधील विधानसभा जागांची संख्या 294 आहे, परंतु कोरोना संक्रमणामुळे दोन उमेदवारांचा मृत्यू झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर आणि शमशेरगंज विधानसभा मतदारसंघात 16 मे रोजी मतदान होणार आहे. बंगालमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान 27 मार्च रोजी झाले, तर दुसरा टप्पा 1 एप्रिलला, तिसरा टप्पा 6 एप्रिलला, चौथा टप्पा 10 एप्रिलला, पाचवा टप्पा 17 एप्रिलला, सहावा टप्पा 22 एप्रिलला. 26 एप्रिल शेवटच्या आणि आठव्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅटट्रिक करणार असल्याचा अंदाज आहे. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज टीव्ही 9- पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण जोर लावलेल्या भाजपचा बंगालमधील सत्ता स्थापनेचं स्वप्न हे तूर्तास पूर्ण होणार नसल्याचं समोर आलंय.

Leave a Reply