गुंडाला कारखाली चिरडून खून करण्याचा केला प्रयत्न

नागपूर : ३० एप्रिल – पैशाच्या वादातून चौघांनी एका गुंडाला कारखाली चिरडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसएफएस शाळेसमोर घडली. जुगनू ज्ञानेश्वर वानखेडे (३०) रा. संजय गांधीनगर, असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी सदर पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली0. निखिल आटोडे (३५) रा. सुभेदारनगर, संकेत पोरंडवार (२५) रा. बिडीपेठ, रोशन राऊत (२६) रा. सुभेदारनगर व बॉबी (२७), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुगनू हा गुन्हेगार आहे.
त्याच्याविरुद्ध विनयभंग, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रोशन याचे किराणा दुकान आहे. जुगनू याने रोशन याच्या सासूकडून ५० हजार रुपये उधार घेतले. त्याने ३० हजार रुपये परत केले.
२० हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करायला लागला. रोशनने त्याला पैशाची मागणी केली. जुगनूने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. बुधवारी रात्री जुगनू हा एमएच-४९, बीपी-४२५७ क्रमांकाच्या मोपेडने मित्र राहुल शेंगळे याला जरीपटका भागात भेटायला जात असल्याची माहिती रोशनला मिळाली.
रोशन व त्याच्या तीन साथीदारांनी एमएच-३१, एस-०३२२ या क्रमांकाच्या कारने त्याचा पाठलाग सुरू केला. एसएफएस शाळेसमोर कारने मोपेडला धडक दिली. जुगनू जखमी झाला.
जुगनूचा मृत्यू झाल्याचे समजून चौघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जुगनूला रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply