गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ पुन्हा एकदा झाले निराधार

गडचिरोली : ३० एप्रिल – आयआयटी दिल्ली येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले आणि सध्या स्वीत्झर्लंड येथे संशोधन अध्यासनपदी असलेले डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची २३ मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण महिना लोटूनही ते रुजू झाले नाहीत. ते येणार की नाही, याची वाट पाहत असतानाच राज्यपाल कार्यालयातून एक पत्र गोंडवाना विद्यापीठात धडकले. त्यानुसार, आता या विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागणार आहे. याचाच अर्थ, आता डॉ. शर्मा हे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रुजू होणार नाहीत. डॉ. शर्मा का रुजू होणार नाही याबाबत सदर पत्रात काहीही नमूद केलेले नाही. किंबहुना, त्यांचा उल्लेखही पत्रात नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताळे यांनी सांगितले.
याबाबत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यपाल कार्यालयातील सचिवांच्या पत्रानुसार आता कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. एवढीच सूचना असून, आता विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडीची प्रक्रिया आम्ही नव्याने सुरू करू. यादरम्यान, अन्य कुणालातरी प्रभार द्या, अशी विनंती मी राज्यपाल महोदयांना केली. पण, त्यांनी पुढचे काही महिने प्रभारी कुलगुरू पद आपल्यालाच सांभाळायचे असल्याचे सांगितले आहे, असे ते म्हणाले. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा 23 मार्च रोजी केली होती. पण आता महिना लोटला तरी, शर्मा यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. तसे,7 सप्टेंबर 2020 रोजीच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपला होता. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता हा कार्यभार पुढेही कायम राहणार आहे.

Leave a Reply