आंध्र प्रदेश : २९ एप्रिल – कोविडमुळे प्राण गमावलेल्या आईचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा रिक्षा न मिळाल्यामुळे एका तरुणाने चक्क आपल्या बाईकवरून मृतदेह १८ किलोमीटर स्मशानापर्यंत नेला. तरुणाने आपल्या भावोजीची मदत घेऊन आईला एखाद्या प्रवाशाप्रमाणेच बाईकवर बसवले होते. मागील सीटवर भावोजी बसून दोघांनी आईचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात नेला. आंध्र प्रदेशातील मन सुन्न करणाऱ्या या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. कोरोना महामारीने प्राण घेतलेली 50 वर्षीय महिला मांडासा गावातील होती. या महिलेचे नाव जी चेन्चुला असे आहे. रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना प्रचंड परवड झाली. महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यांची चाचणी करण्यात आली होती. मात्र वेळीच निदान होऊ शकले नाही. परिणामी कोरोनावरील उपचारही झाले नाहीत. यात महिलेची तब्येत आणखी ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पुढे मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा रिक्षा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठलेच वाहन मिळाले नाही.
अखेर मुलाने आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याचे ठरवले व तसे केलेही. वाटेत पोलिसांनी त्यांची बाईक अडवली. पण त्यातही त्यांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका मिळवत बाईक पुढे मार्गस्थ केली. हा प्रकार पाहणाऱ्याचे मन सुन्न केले आहे. दरम्यान आईचा मृत्यू हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे चा झाल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. सिटीस्कॅनचा रिपोर्ट मिळवण्यासाठी तासन् तास खर्च घालवले. त्यामुळे आईवर वेळीच कोरोनाचे उपचार होऊ शकले नाही असा दावा तरुणाने केला आहे.