मुंबई : २९ एप्रिल – भाजपच्या नेत्या आणि माजी महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच’ असं भावनिक ट्वीट केलं आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या, ताई’ अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
आज सकाळी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.
याधीही डिसेंबर महिन्यात पंकजा मुंडे यांची प्रकृती खालावली होती. ‘सर्दी खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांनी isolate होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा तब्येत खालावल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.