मुंबई : २८ एप्रिल – महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्त्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ठाकरे सरकारने येत्या १ मे २०२१ पासून १८ वर्षे ते ४४ वर्षे या वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा राज्यातील ५ कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, “आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, राज्यातील ५ कोटी ७१ लाख (१८ ते ४४ वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे.”
राज्यात १ मे २०२१ पासून लसीकरण सुरू होणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लसींचा साठा उपलब्ध नसल्याने तात्काळ सर्वांचे लसीकरण सुरू होणार नाही. नागरिकांना विनंती आहे की, थेट सेंटरवर न जाता Co-Win App वर नाव नोंदणी करुन मगच लसीकरणासाठी केंद्रावर जावे.
मंगळवारी (२७ एप्रिल २०२१) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणावर म्हटलं होतं की, राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याच्या कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केली आहे. या संदर्भात आता निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारमधील बहुतेक मंत्री हे मोफत लसीकरण करण्यात यावे यासाठी आग्रही आहेत तर काही मंत्र्यांचे म्हणणे आहे की, दारिद्र रेषेखालील नागरिकांना मोफत लस देण्यात यावी. तसेच ज्या नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी लसीकरणाचे पैसे द्यावेत. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. पण अखेर राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय़ घेतला आहे.