भाजप खासदाराने कोरोना काळात औषध वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली “गंभीर” दखल

नवी दिल्ली : २८ एप्रिल – भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचं वाटप केलं आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचं औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे काय?, औषधांचं वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता काय? असा सवाल कोर्टाने केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोर्टाने हा सवाल केला. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचं वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते. औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. औषधे वाटण्यासाठीही गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतलं होतं का? ते कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचं वाटप करत होते? असा सवाल कोर्टाने केला आहे.
गौतम गंभीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा असल्याने त्यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या आधी दिल्ली सरकारच्या वकिलाने कोर्टात याबाबतची माहिती दिली होती. लोकांना फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता सर्रासपणे फॅबीफ्ल्यू औषधांचं मोफत वाटप करत आहे, असं या वकिलाने म्हटलं होतं. त्यावर हे काम चांगलं आहे. पण पद्धत चांगली नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
गौतम गंभीर यांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीकरांना फॅबीफ्ल्यूचं औषध वाटप करण्याची घोषणा केली होती. तसेच लोकांना ऑक्सिजन सिलिंडर वाटप करण्यात येणार असल्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार 22 पुसा रोडवरील त्यांच्या कार्यालयातून सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत औषधांचं वाटप केलं जात होतं.

Leave a Reply