नागपूर : २८ एप्रिल – कोरोना संसर्गाची स्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या नागपूर पालिका आयुक्तांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित कक्ष व विधी विभागाचे राज्य सरचिटणीस महेश जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केले. नागपुरात तुकाराम मुंढे असते तर स्थिती नियंत्रणात असती, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यात, खास करून नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सद्य परिस्थिती ही प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे तसेच नागपूर जिल्ह्यात आणि त्यातही नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग इतक्या मोठय़ा प्रमाणात आहे की वैद्यकीय सुविधांच्या आभावापायी रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. इतकी दयनीय परिस्थिती नागपूरची जनता आज भोगत आहे. शासकीय रुग्णालयात एका व्हेंटिलेटर बेडवर दोन रुग्ण अशी परिस्थिती आहे. दोन बेड मधील अंतरात गादी टाकून रुग्णांना झोपवले जात आहे.महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरात आज इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नागपूरकर भयभीत होऊन, मुठीत जीव घेऊन जगत आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिली कोरोना लाट ही त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळली. ज्यामुळे त्याची झळ नागपूर जनतेला फारशी जाणवली नाही. कोणतेही निर्णय घेताना फक्त आणि फक्त जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन, फार कोणा लोकप्रतिनिधींचा विचार न करता त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. ज्याचा फायदा कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपूरच्या जनतेला झाला. नागपूर पालिकेत कोविड वॉर रूम उभी करून रोज संध्याकाळी सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन माहिती घेणारे व वेळेप्रसंगी अधिकार्यांना ताकीद देऊन त्यांच्याकडून उत्तम कार्य करवून घेणारे तुकाराम मुंढे आज पालिका आयुक्त असते तर नागपूरची आज जितकी बिकट व दयनीय परिस्थिती आहे, तितकी निश्चित नसती हे निवेदनात आवर्जून नमूद करण्यात आले. नागपूर मनपाचे आज असलेले आयुक्त राधाकृष्णन बी. हे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावात तसेच त्यांच्या कलेकलेने काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडायच्या आत त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, ही आग्रही मागणी जनहित कक्ष व विधी विभागातर्फे करण्यात आली आहे.