दोन बालकांनी संगनमताने केला गुंडाचा खून

नागपूर : २८ एप्रिल – राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध नागरिकांच्या सहकार्याने बऱ्यापैकी यशस्वी होत असताना गुन्हेगारांना याचा काहीही फरक पडलेला नाही. गेल्या दहा दिवसांत नागपूर शहरात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. शहरातील पाचपवली पोलीस स्टेशन परिसरात दोन विधिसंघर्ष बालकांनी संगनमत करून एका गुंडाचा निर्घृन खून केला आहे. इंद्रजित बेलपारधी असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात १८ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद होती. तर आरोपी विधिसंघर्ष बालकांवर देखील २०१९मध्ये खूनाचा गुन्हा दाखल आहे.
काही दिवसांपूर्वी आरोपी आणि मृत यांच्या गाडीचा एकमेकांच्या गाड्यांना धक्का लागला. या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तो वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र मृत इंद्रजित बेलपारधी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर जवळपास १८ गुन्हे दाखल असल्याने त्याची परिसरात दहशत होती. इंद्रजित आपल्याला मारेल याची भीती आरोपीच्या मनात होती. घटनेच्या वेळी आरोपी आणि मृत एका ठिकाणी समोरासमोर आले अशा परिस्थितीत इंद्रजीत हा आपल्याला मारेल, या भीतीने दोन्ही विधिसंघर्ष बालकांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील दोन्ही विधिसंघर्ष बालकांनी जिवाच्या भीतीने इंद्रजितचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी २०१९ मध्ये या दोघांनी एका व्यक्तीचा खून केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply