वर्धा : २८ एप्रिल – राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरीता आमदारांचा एक वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकास निधी कोरोना संसर्ग रोखण्याकरीता खर्च करावा. यातून विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदार निधीतून जवळपास १ हजार कोटींची तरदूत होऊ शकेल, अशी मागणी माजी आमदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहुन केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यामध्ये स्थिती अतिशय भयावह होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. या गंभीर परीस्थितीला आरोग्य विभाग सामर्थ्याने लढा देत असला तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात डॉक्टर नर्सेसचा अपुरा स्टाफ, औषध साठा, ऑक्सिजन व्हेंटीलेटर्स बेड, हे वाढत्या रुग्णसंख्येपुढे कमी पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करणे गरजेचे आहे.
मी आर्वी विधानसभा मतदारसंघामधील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्याने आढावा घेत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे व वरील सेवेअभावी आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हीच परिस्थिती राज्यातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. यासाठी आरोग्य सेवा बळकटी करण करण्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास निधी हा आरोग्य सेवेकरीता वळता करावा.
या विकास निधीपैकी प्रत्येकी १ कोटीचा निधी कोरोना संसर्ग रोखण्याकरीता, आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतु उपलब्ध होणाऱ्या या निधीमधुन राज्यामध्ये अधिक सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करणे शक्य होवू शकत नाही. त्यामुळे विधानसभा व विधानपरीषदेचे एकूण 366 सदस्यांचा एक वर्षाचा स्थानिक विकास निधी एकाचवेळी आरोग्य सेवेकरीता उपलब्ध करून दिल्यास या निधीमधुन आरोग्य यंत्रणा बळकट होवून कोरोनावर मात करणे शक्य होऊ शकेल.
एकदा आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम झाल्यास नक्कीच मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याकरिता आमदारांच्या सण 2021-22 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकास निधी एक विशेष बाब म्हणुन आरोग्य सेवेकरीता वळता करण्यासंदर्भात शासनस्तरावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.