साकोलीतील तरुणीने उचलली कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी, सर्वत्र कौतुक

भंडारा : २७ एप्रिल – कोरोना संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या आजारामुळे मृत्यूदरही मोठय़ा प्रमाणात वाढला असून अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. अशास्थितीत साकोली येथील एका तरुणीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी उचलली आहे. चांदणी बडोले (२६) रा. साकोली असे या तरुणीचे नाव असून तिने आतापर्यंत ३९ जणांवर अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. हे धाडस पाहून तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
चांदणी बडोले हिचे वडील माजी सैनिक होते. आई आणि बहिणीसोबत ती साकोली येथे वास्तव्यास आहे. मागील वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे कामाची भ्रांत झाली. हाताला काम नसल्याने तिची कामासाठी शोधाशोध सुरू झाली. दरम्यानच्या काळात कोरोनाचा कहर कमी झाल्याने हाताला काम मिळेल अशी तिची अपेक्षा होती. परंतु, मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोकेवर काढल्याने तिला काम मिळण्याची आशा पुन्हा धूसर झाली. दरम्यान, साकोली नगर परिषदेत तिची रोजंदारी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कोरोना आजारामुळे साकोली परिसरात मृत्यूदर वाढू लागला. त्यामुळे मृतकांवर साकोली येथेच अंत्यसंस्कार करण्याची गरज निर्माण होऊ लागली. यासाठी साकोली नगर परिषदेने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे अंत्यसंस्कार साकोलीतच करण्याचा निर्णय घेतला. १८ एप्रिलपासून साकोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रि या सुरू झाली. परंतु, मृतकांवर अंत्यसंस्कार करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. आधीच कोरोनामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्काराचा मुद्दा उपस्थित झाला. अशास्थितीत साकोली नगर परिषदेत रोजंदारी कर्मचारी असलेल्या चांदणीने ही जबाबदारी उचलली. रुग्णालयात अथवा घरी मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांना आणण्यासाठी चांदणी स्वत: जाते. स्मशानभूमीत आल्यानंतर सरण रचणे, त्यावर मृतदेह ठेवणे, त्यानंतर अंत्यसंस्कार करणे ही जबाबदारी चांदणी पार पाडत आहे. १८ एप्रिलपासून साकोली येथील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम ती अविरत करीत आहे. २४ एप्रिल रोजी तिने सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. तर २५ एप्रिल रोजी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत चांदणीने ३९ मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम केले आहे.
एकेकाळी तिच्या हाताला काम नव्हते. आता कितीही रात्र झाली तरी जोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत नाही, तोपर्यंत ती स्मशानभूमीतच थांबते. अंत्यसंस्कारासाठी तिने कधीही आपले हात आखडते घेतले नाही. तिच्या या कामात साकोलीतीलच जितेंद्र वलथरे हा युवक सोबतीला आहे. तिच्या या धाडसाचे कौतूक होत आहे.

Leave a Reply