वाशिममध्ये भरदिवसा ७०० ग्राम सोन्यासह २८ लाखाची घरफोडी

वाशीम : २७ एप्रिल – कारंजा बायपासवरील धर्मकाटा जवळील गुरुदेवनगर येथील मोतीराम तुकाराम नगरे यांच्या घरी भरदिवसा रोख १५ हजार व ७00 ग्रॅम सोने, असा एकूण अंदाजे २८ लाख ५0 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील बायपासवरील धर्म काट्याजवळील मोतीराम तुकाराम नगरे व त्यांच्या पत्नी हे दोघे शिक्षक असून, कामानिमित्त बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने भरदिवसा दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील रोख १५ हजार रुपये व ७00 ग्रॅम सोने, असा अंदाजे २८ लाख ५0 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली.
या घटनेमुळे शहरात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नगरे यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, त्यावरुन पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांनी वाशीम येथून श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञाला बोलावून घटनास्थळाची पाहणी केली. त्यादरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये काही फोटो मिळाल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

Leave a Reply