येत्या काही दिवसात परिस्थिती नक्कीच सुधारेल – नितीन गडकरी

नागपूर : २७ एप्रिल – नागपूर जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज वाढत असताना भिलाई येथून पुरवठा वाढला आहे. यासोबत ऑक्सिजनची पूर्तता होण्यास मदत होत आहे. यासह वर्ध्याच्या कंपनीतूनही रेमडेसिवीर उत्पादन सुरू होत आहे. यामुळे येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्त केली जात आहे. ते नागपुरात केटी नगर येथील सुरू करण्यात आलेल्या शंभर खाटांचे कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
भिलाई येथून ॲाक्सीजनचा कोटा 60 टनवरुन 110 मेट्रीक टन करण्यात आला आहे. तसेच तिथूनच दुसऱ्या प्लॅन्टमधून आणखी 30 टन ऑक्सिजन हे मिळत आहे. यामुळे आता भिलाईवरुन मिळणार कोटा हा 140 टन झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पण, वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली आहे. यात वाहतुकीसाठी प्यारे खान यांच्या मदतीने 7 टँकरच्या साहायाने ऑक्सिजन आणले जात आहे. पण, आणखी टँकर आणि सिलिंडरची गरज आहे.
…तर संपूर्ण विदर्भातील ऑक्सिजनची गरज होईल पूर्ण
नागपुरातील आयनॉक्स कंपनी 80 टन ऑक्सिजन हे हवेतून तयार करत आहे. यात नागपूर आणि विदर्भाची गरज पाहता 200 टन ऑक्सिजन रोज गरजेचे आहे. वाहतुकीची जबाबदारी प्यारे खान यांच्या कंपनीला दिले आहे. नागपुरात गाडी आल्यावर लवकरात लवकर रिकामी होऊन परत गेली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त ऑक्सिजन साठा आणण्यास मदत होईल. बल्लारी आणि विशाखापट्टणम येथून टँकर आणले आहे. यात भिलाईहून 140 मेट्रीक टन ॲाक्सीजन आणण्यास मदत मिळाल्यास नागपूरसह विदर्भातील ऑक्सिजनची गरज पूर्ण होण्यास मदत होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
काही दिवसांत ऑक्सिजनचे संकट नसणार
नागपुरातील सहा रुग्णालयात ऑक्सिजनची तयार करण्याचा प्लान्ट लावला जात आहे. विदर्भातही अनेक जिल्ह्यात ऑक्सिजन कन्सनस्ट्रेटर पोहचवले गेले आहे. गडचिरोलीच्या दुर्गाम भागातून सर्वत्र हे सिलिंडर पोहोचवले गेले आहे. अमेरिकेचे डॉ. शाह यांनी 1 हजार 100 ऑक्सिजन काँसेनट्रेटर हे एअर इंडियाच्या विमानातून विनामूल्य खर्चात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नितीन गडकरी म्हणालेत. येत्या काही दिवसात ऑक्सिजनचे संकट नसणार आहे. रेशनिंगसारखा कोटा कमी अधिक प्रमाणात नसून रुग्णाच्या गरजेनुसार असतो, असेही ते म्हणालेत.
वर्ध्यात उद्यापासून सुरू होणार रेमडेसिवीरचे उत्पादन
वर्धा जिल्ह्यात उद्यापासून (दि. 28 एप्रिल) 30 हजार व्हायल्स रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू होत आहे. हैदराबादहून पथक आले असून यात ट्रायल सुरू आहे. उत्पादन होणाऱ्या रेमडेसिवीरचा विदर्भात पुरवठा केला जाईल. ॲाक्सीजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा विदर्भातील जनतेला दिलासा मिळाला आहे. नागपुरात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. काही दिवसांत परिस्थिती बदलण्याची आशा व्यक्त केली.

Leave a Reply