यवतमाळ : २७ एप्रिल – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचे वय ४ वर्ष असून ती गर्भवती होती. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे नसल्याने शिकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले असल्याचे शक्यता आहे.
दरम्यान, वनरक्षकाने ही माहिती वरिष्ठांना दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव)सुभाष पुराणिक, मुकु टबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, घटनास्थळी पोहोचले. सुमारे चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या खुणा आढळून आल्या.