चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर

चंद्रपूर : २७ एप्रिल – जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 15 एनआयव्ही आणि 2 मिनी व्हेंटीलेटर जिल्हा रूग्णालयासाठी दोन दिवसापुर्वी उपलब्ध केले. सोमवारी पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर आ. मुनगंटीवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांना सुपुर्द करत, या समस्येवर उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले आहे. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, भाजपा शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, रविंद्र गुरनुले, ब्रिजभुषण पाझारे, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, देवानंद वाढई, विठ्ठल डुकरे यांची उपस्थिती होती.
कोरोना रूग्णांची संख्या चंद्रपूर जिल्हयात दिवसेंदिवस वाढत आहे. व्हेंटीलेटरचा तुटवडासुध्दा मोठया प्रमाणावर जाणवत आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना व्हेंटीलेटर उपलब्ध करण्याबाबत विनंती केली होती. नेहमी प्रमाणेच नितीनजींनी आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत 15 एनआयव्ही व दोन मिनी व्हेंटीलेटर उपलब्ध केले व आज पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर उपलब्ध केले. विकासकामे असो वा लोकोपयोगी उपक्रम आम्ही हाक द्यायची व नितीनजींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दयायचा हे समीकरण गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्हा अनुभवत आहे. त्यांच्या दातृत्वाला आपण वंदन करतो अशी भावना व्यक्त करत चंद्रपूरकर जनतेच्या वतीने आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.-

Leave a Reply