कोरोना स्थितीवर ब्रिटन, सौदीसह अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात

नवी दिल्ली : २६ एप्रिल – करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलं आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचं आणि शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही तीन लाखांहून अधिक झाल्याने जगभरात तो चिंतेचा विषय झाला आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून करोना उद्रेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे. या महाभयानक आपत्तीला सामोरे जात असलेल्या भारतीयांबाबत त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अशाच भावना व्यक्त केल्या असून भारत हा आमचा भागीदार देश असल्याचे सांगून भारताला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वाासन दिले आहे.
“करोनाला हरवण्यासाठीच्या या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम भारतासोबत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,” असं ब्रिटनचे भारतातील राजदूत असणाऱ्या अॅलेक्स इलिस यांनी सांगितलं आहे.
युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.

Leave a Reply