कोरोनाचे भयाण वास्तव, मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची भंडारा प्रशासनावर वेळ

भंडारा : २६ एप्रिल – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीची स्थिती याची प्रचिती येत आहे. भंडारा स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे. मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशसानावर आली असून एकाच वेळी 20-25 कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
विदर्भात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. भंडारा शहरालगत गिरोला स्मशानभूमी रोज 20 ते 25 लोकांवर अंतसंस्कार केले जात आहे.
कुणाला अंत्यसंस्करासाठी ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आता भंडारा जिल्हा प्रशासनाकडून आधीच सरण रचून ठेवले जात आहे. त्यासाठी दररोज 2 ते 3 ट्रक लाकुड लागत आहे.
तर भंडारा जिल्ह्यात आता पर्यंत 672 कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून भंडारा नगर परिषदेचे 5 कर्मचारी अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून येत असून स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे आता चक्क जमिनीवरच सरण रचण्यात येत आहे. तर स्मशानभूमीच्या परिसरात नातेवाईक थांबलेले असतात. आपल्या नातलगाच्या मृतदेहव अत्यसंस्कार दूरच पाहून अखेरचा निरोप देत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

Leave a Reply