नागपुरात रेल्वेच्या ११ डब्यांमध्ये सुरु होणार कोविड केअर सेंटर

नागपूर : २५ एप्रिल – कोरोना संशयितांवर उपचारासाठी रेल्वेने तयार केलेल्या कोचेस धुळखात पडून होत्या. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ११ डब्‍यांमध्ये कोविड केयर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. डब्यांमध्ये तातडीने आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना महापालिकेने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे यांना पत्राद्वारे केली आहे.
नागपूर विभागात ४८२ आयसोलेशन कोव्हिड कोच तयार करण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास या कक्षाचा उपयोग होणार होता. मात्र राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन, मनपाने त्याला मान्यता दिलीच नसल्याने त्याचा उपयोग आतापर्यंत होऊ शकला नाही.
मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बाधितांसह मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालय फुल असून खाटा शिल्लक नाही. ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. अशावेळी उच्च न्यायालयाने स्वत: याविषयी जनहित याचिका दाखल करीत कोविड कोचचे झाले तरी काय, विचारणा सरकारला केली आहे. अखेर उच्च न्यायायलयाच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली. शेवटी नागपूर महानगरपालिकेने नागपूर रेल्वे स्थानकावर असलेल्या ११ कोविड कोचचा कोरोना रुग्णांसाठी उपयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना तसे पत्र लिहले आहे.
आता नागपूर रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे डब्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात ऑक्सीजन सिलेंडरच्या उपलब्धतेनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोना विषाणूची लक्षणे असलेले qकवा सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची येथे व्यवस्था करता येईल. तसेच रेल्वेने येणारे प्रवाशी यांचेमधून निघणारे पॉझिटीव्ह प्रवाशांची देखील यामध्ये व्यवस्था करण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ४८२ कोविड कोच तयार करण्यात आले होते. त्यापैकी आता ४८ कोविड कोच शिल्लक आहेत. नागपूर स्थानकावर ११, वर्धा १२ तर आमला येथे ५ कोच तयार करण्यात आले. या सर्व कोचमध्ये मध्ये ५०० रुग्णांचा उपचार होऊ शकतो. यात ६९ आयसोलेशन बेड आणि १८ आयसीयूची सुविधा असणारे बेड सज्ज आहेत.

Leave a Reply