नागपूर : २५ एप्रिल – नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असताना, आमदार महाशय फिरकलेच नसल्याची तक्रार होत आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील कामठी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर हरविल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इतकंच नाही तर संतापलेल्या काहींनी आमदार सावकर हे कोरोनामुळे वारले असंही लिहून पोस्ट व्हायरल केली. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदार टेकचंद सावरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
नागपुरात कोरोनाचं थैमान आहे. मात्र कामठी मतदारसंघातील भाजप आमदार टेकचंद सावरकर हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार महोदय हरवल्याची पोस्ट, सोशल मीडियावर फिरत आहे. एव्हढंच काय तर संकटाच्यावेळी आमदार महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, संतापलेल्या एका मतदाराने, आमदार सावरकर यांचं कोव्हिडमुळे निधन झाल्याची पोस्टही व्हायरल केली.
या संदर्भात आमदार टेकचंद सावरकर यांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कोरोना काळात आमदार मतदारसंघात फिरत नसल्याने नाराज मतदारांनी अनेक पोस्ट व्हायरल केल्या आहेत. नागपूरमध्ये कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याने सर्वसामान्य कोरोनाबाधित नागरिकांचे हाल होत आहेत. कोणत्याही स्तरावरून मदत मिळत नसल्याने आता नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊ लागला आहे.