नवी दिल्ली : २२ एप्रिल – केंद्र सरकारने नुकताच १८ वर्षांवरील सर्वांना करोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून देशभर करोनाच्या लसींची मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर लसींची गरज कशी भागवायची, याचं नियोजन प्रशासनाकडून सुरू असताना आता चोरट्यांची नजर करोनाच्या लसींकडे वळली आहे. हरयाणातल्या एका रुग्णालयातून चोरट्यांनी चक्क लसींचा साठा लांबवला आहे. एकूण १७१० डोसची चोरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पैसे किंवा इतर मेडिसिनला चोरट्यांनी हातही लावला नसल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लसींच्या वाढत्या मागणीमुळे लसींची चोरी होण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत.
हरयाणातल्या जिंद पीपी सेंटर जनरल हॉस्पिटलमधला हा प्रकार आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठीचा करोना लसींचा साठा या रुग्णालयात ठेवण्यात आला होता. मात्र, हॉस्पिटलच्या स्टोअररूमजवळ सीसीटीव्ही किंवा सुरक्षारक्षक अशी सुरक्षेची कोणतीही तजवीज करण्यात आली नव्हती. त्यामुळे चोरट्यांसाठी लसींची चोरी करणं सोपं ठरलं.
या चोरीमध्ये चोरांनी स्टोअररूममधल्या इतर कोणत्याही औषधाला किंवा रोख रकमेला हातही लावलेला नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे फक्त लसींचीच चोरी करण्याच्या हेतूनेच चोरटे इथे आल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. देशभरात करोना लसींचे डोस वाया जाण्यामध्ये हरयाणाचा दुसरा क्रमांक लागतो, तर पंजाब राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.
दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटनं कोविशिल्ड लसीच्या डोसची किंमत वाढवली आहे. आता राज्य सरकारांना हे डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना तेच डोस ६०० रुपयांना मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे करोना लसीचे डोस चोरी होणं ही गंभीर बाब मानली जात आहे.