मुंबई : २२ एप्रिल – देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्टनुसार सलमान खान फ्रंटलाईन कामगारांसाठी फूड किट्स पाठवत आहे. तो सर्वांना या फूड किटचे वाटप करत आहे. युवा सेनेचे नेते राहुल कनल यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल म्हणाले की, सलमान पोलीस अधिकारी, बीएमसी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचार्यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे आला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशीशी बोलताना राहुल म्हणाले की, सलमान जे फूड किट देत आहे त्यात मिनरल वॉटर, चहा, बिस्किटे आणि स्नॅक्सचा समावेश आहे. उपमा, पोहे, वडा पाव आणि पावभाजी या पदार्थांचा देखील यात समावेश आहे. पुढे ते म्हणाले, ‘आम्ही मिळून एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू केला आहे, ज्यावर फ्रंटलाईन कामगार कॉल करू शकतात आणि मदतीसाठी विचारणा करू शकतात. त्यानंतर आम्ही त्यांच्या भागात जाऊन त्यांना मदत करू. त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद म्हणण्याची ही सलमानची खास शैली आहे. हे सर्व 15 मेपर्यंत सुरू राहणार आहे.’
आतापर्यंत सलमानने वरळी आणि जुहूमधील फ्रंटलाइन वर्कर्सना मदत केली असून येत्या काही आठवड्यांत मुंबईतील इतर शहरांमध्येही मदत दिली जाईल, असेही राहुल यांनी सांगितले.